मराठी म्हणी व अर्थ: Marathi mhani v arth.
मराठी म्हणी हा मराठी भाषा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.
![]() |
मराठी म्हणी व अर्थ |
म्हण म्हणजे लोकांच्या सतत बोलण्यात येणारे लहान, चिमुकले, चटकदार, बोधप्रत सामान्यत: ज्ञात मार्मिक वाक्य आहे.
म्हणी म्हणजे पारंपरिक वाक्य की जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते.
जी वाक्यरचना बोलणाऱ्याच्या मनातील एक वेगळा अनुभव व्यक्त करते.
म्हणी म्हणजे एक वेगळ्या धाटणीचे बोलणे, म्हणी बोलण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते.
मराठी म्हणी व अर्थ
* अतिशहाणा त्याचा बैल रिकामा -
अतिशहाणपण नुकसान कारक ठरते.
* अति तिथे माती-
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
* अंथरूण पाहून पाय पसरावे-
आपल्या ऐपती प्रमाणे खर्च करावा.
* आयत्या बिळावर नागोबा-
दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे.
* आधी पोटोबा मग विठोबा-
प्रथम पोटाची सोय पहावी नंतर देवधर्म करावा .
* आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे-
अपेक्षा पेक्षा किती जरी जास्त फायदा होणे.
* आधीच उल्लास त्यात फाल्गुन मास-
एखादी गोष्ट करायला आणि अनुत्सुक माणसाला न करायला नेमके कारण सापडते.
* अडला हरी गाढवाचे पाय धरी-
थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खाची मनधरणी करावी लागते.
* आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार-
स्वतःजवळ नाही तर दुसऱ्यास काय देणार.
* अंगापेक्षा बोंगा मोठा-
खऱ्या गोष्टी पेक्षा त्याचे अवडांबरच मोठे.
* आपला हात जगन्नाथ-
आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणे.
* आंधळे दळते नी कुत्र पीठ खाते-
एकाने मेहनत करायची व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा.
* इकडे आड तिकडे विहीर-
दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.
* उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग-
उतावळ पणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
* उथळ पाण्याला खळखळाट फार-
अंगी गुण थोडे असणारा बढाई जास्त मारतो.
'मराठी म्हणी व अर्थ: Marathi mhani v arth.'
* उंदराला मांजर साक्ष-
वाईट कृत्य करत असताना एकमेकांना साक्ष देणे.
* एका हाताने टाळी वाजत नाही-
भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असत नाही.
* ऐकावे जनाचे करावे मनाचे-
अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे.
* एक ना धड भाराभर चिंध्या-
एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने सर्वच गोष्टी अर्धवट राहतात.
* एका किंवा एकाच माळेचे मणी-
सगळीच माणसे सारखे स्वभावाची.
* कर नाही त्याला डर कशाला-
निरपराधी माणूस निर्भय असतो.
* करावे तसे भरावे-
वाईट कृत्य करणाऱ्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
* काप गेले नी भोके राहिली-
वैभव जाऊन त्याच्या फक्त खुणा राहिल्या.
* कामापुरता मामा-
काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती.
* कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
शूद्र माणसाच्या निंदने थोरांचे नुकसान होत नाही.
* कसायला गायधार्जीनी-
दुष्ट व कठोर माणसांशी सर्व लोक नम्रतेने वागतात.
* काखेत काळसा नि गावाला वळसा-
हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे
* कोळसा उघळावा तितका काळाच -
वाईट गोष्टी कितीही तपासली तरीही त्यातून वाईटच निघणार.
* कोल्हा काकडीला राजी-
शूद्र माणसे क्षुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात.
* कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ-
आपल्याच जातीतला फितुरीमुळे आपला घात करतो.
* खान तशी माती-
आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांची वर्तणूक असते.
* खायला काळ भुईला भार-
निरूधोगी मनुष्य सर्वांना भारभुत होतो.
* खाई त्याला खवखवे-
वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.
* खोट्याच्या कपाळी गोटा-
वाईट काम करणाऱ्या चेच नुकसान होते.
* गर्वाचे घर खाली-
घमेंडखोर माणसावर नाचक्कीची वेळ येते.
* गरज सरो वैद्य मरो-
गरज संपल्यावर उपकार कर्त्याला विसरणे.
* गरजेल तो पडेल काय?-
केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीच होत नाही.
* गाढवाला गुळाची चव काय?
मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
* गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता-
मूर्खाला केलेला उपदेश निष्फळ ठरतो.
* गुरुची विद्या गुरुला फळली-
एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटने.
* गाड्या बरोबर नळ्याची यात्रा-
मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो.
* गोगलगाय अन् पोटात पाय-
एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
* गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ-
मूर्ख लोक एकत्र आल्यास मूर्खपणाचीच कृती करणार.
* घरचे झाले थोडे व्याहाने धाडले घोडे-
स्वतःच्या कामाचा व्याप असताना दुसऱ्याने आपलेही काम लादणे.
* घरोघरी मातीच्या चुली-
सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
* घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात-
प्रतिकूल परिस्थितीत सारखेच उलट वागू लागतात.
* चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे-
प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची आयुष्यात संधी मिळतेच.
* चोराच्या उलट्या बोंबा-
स्वतः च गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.
* चोराच्या मनात चांदणे-
वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.
* चोर सोडून संन्यासाला सुळी देणे-
खऱ्या अपराध्याला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
* चोराच्या हातची लंगोटी--
लबाड, कंजूषाकडून थोडे मिळाले तरी भाग्याचे.
* जाळ्यात राहून माशाशी वैर -
सहवासात राहायच्या व्यक्तीशी वैर करू नये.
* जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही-
मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
* ज्याच्या हाती ससा तो पारधी-
ज्याला यश आले तो कर्तबगार.
* ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी-
एकमेकांची वर्मे माहीत असलेल्या माणसांशी गाठ पडणे.
* ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे-
एखाद्याचे भले करायला जावे तर त्याच्या गोष्टीस हेकेखोरपणे विरोध करतो.
* ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी-
उपकार कर्त्याचे उपकार स्मरून त्याची बाजू घेणे.
* झाकली मूठ सव्वा लाखाची-
व्यंग गुप्त ठेवणेच फायदेशीर असते , मौन पाळून अब्रू राखणे.
* टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही-
कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही.
* डोळ्यात केर आणि कानात फुंकर-
रोग एका जागी पण इलाज दुसरीकडे करणे.
* डोंगर पोखरून उंदीर काढणे
डोंगराएवढे ( खूप) कष्ट करून लहान सा मोबदला मिळविणे.
* डोळ्यापुढे काजवे दिसणे-
खूप भीती वाटणे त्रास होणे
* ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला-
संगतीमुळे चांगल्या पेक्षा वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो.
* तळे राखी तो पाणी चाखी-
स्वाधीन केलेल्या गोष्टींचा तो थोडा तरी फायदा घेतोच.
* ताकापुरते रामायण-
एखाद्या कडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.
* तहान लागल्यावर विहीर खणणे -
आयत्यावेळी कोणतीही गोष्ट होत नसते.
* ताकाला जाऊन भांडे लपवणे
मनातील हेतू स्पष्ट न करता आढेवेढे घेऊन नंतर सांगणे.
* तन खाई धन-
वरवर क्षूल्लक दिसणारी गोष्ट पुढे घातक ठरू शकते.
* ता म्हणता ताक भात समजावा-
थोडेसे सांगण्यावरून सर्व गोष्टी आता त्यांनी समजून घेणे.
* तेल गेले, तूप गेले ,हाती राहिले धुपाटने -
स्वतःच्या मूर्खपणामुळे दोन्हीकडून नुकसान होते व हाती काहीच राहत नाही.
* तोंड धरून बुक्क्यांचा मार-
स्वतःचा अपराध असूनही दुसऱ्याला विनाकारण शिक्षा करून त्यासाठी त्याला तक्रारही करू न देणे.
* थेंबे थेंबे तळे साचे-
हळूहळू संचय करणे
* दगडापेक्षा वीट मऊ-
निरुपाय म्हणून मोठ्या संघटापेक्षा लहान संकट कमी नुकसानीचे म्हणून स्वीकारणे.
* दृष्टी आड सृष्टी -
आपल्या मागे काय चालते आहे ते दिसत नाही म्हणून दुर्लक्ष करणे.
* दाम करी काम ,बीबी करी सलाम-
पैसा आहे तर मान आहे पैशाने खूप कामे पार पाडता येतात.
* दिव्याखाली अंधार-
दिवा दुसऱ्याला उजेड देत असला तरी त्याच्या खाली अंधारच असतो, तसेच चांगले माणसात सुद्धा एखादा दोष असू शकतो.
* दुधाने तोंड भाजले की ताक सुद्धा फुंकून पितात-
एकदा आददल घडल्यावर मनुष्य अगदी साध्या गोष्टीत सुद्धा काळजी घेतो.
* दुष्काळात तेरावा महिना-
संकटात सापडलेल्या माणसावर आणखीन एका संकटाची भर पडणे.
* दुरून डोंगर साजरे-
अडचणीची गोष्ट लांबून सोपी वाटते पण प्रत्यक्ष करायला गेल्यास त्यातील अडचणी कळून येतात.
* दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही-
दुसऱ्यांची शुल्लक चूक असली तरी ती दिसते ,पण स्वतःच्या अंगी असलेला मोठा दोष दिसत नाही.
* देश तसा वेश -
परिस्थितीप्रमाणे वागण्यास शिकले पाहिजे.
* दैव देते पण कर्म नेते-
सुदैवाने एखादी गोष्ट लाभते पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसानही होऊ शकते.
* दोन्ही घरचा पाहुणा उपाशी-
दोघांच्या आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो.
* धर्म करता कर्म उभे राहते-
दुसऱ्यावर उपकार करावयास जाऊन स्वतःवरच संकट ओढून घेणे.
* धर्मावर सोमवार सोडणे-
स्वतः काही नुकसान न सोसता परस्पर गोष्टी भागविणे.
* नव्याचे नऊ दिवस -
नवीन वस्तूचे आकर्षण थोडेसे दिवस टिकते.
* न करता वार शनिवार-
एखादे काम मनापासून करायचे नसले की कोणतेतरी शिल्लक कारण सांगून ते काम टाळणे.
* नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्णे -
दोषाने युक्त असलेले काम करीत असता एकामागून एक अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.
* नाक दाबले म्हणजे तोंड उघडते-
एखाद्याला पेचात अडकविल्याशिवाय तो आपले काम करून देणार नाही किंवा आपले म्हणणे कबूल करणार नाही.
* नावडतीचे मीठ आळणी -
नावडत्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी ती वाईटच दिसते.
* नाचता येईना अंगण वाकडे -
आपल्याला एखादे काम येत नसल्यास स्वतःचा कमीपणा लपविण्यासाठी संबंधित दुसऱ्या गोष्टीतील दोष दाखविणे.
* नाव मोठे लक्षण खोटे -
कीर्ती मोठी असली तरी कृती मात्र नावाला खोटेपणा आणणारी.
* नाकापेक्षा मोती जड-
एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षा अधिक महत्त्व द्यावयाचे.
* पळसाला पाने तीनच-
सगळीकडे सारखीच परिस्थिती असते.
* पदरी पडले पवित्र झाले-
कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नावे न ठेवता तिच्या बाबतीत समाधान मानावे.
* पालथ्या घड्यावर पाणी-
एखाद्याला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग न होणे.
* पायातली वाहन पायात बरी-
प्रत्येकाला त्याच्या दर्जेप्रमाणेच वागवावे.
* पाचही बोटे सारखी नसतात-
कोणतीही गोष्ट दुसऱ्या गोष्टी सारखी असू शकत नाही ,सर्व माणसे सारखे स्वभावाचे असू शकत नाही.
* पाठीवर मारा पोटावर मारू नका-
शारीरिक शिक्षा करावी पण पोटापाण्याची कमी करू नये.
* पी हळद आणि हो गोरी-
कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करू नये.
* पुढच्याला ठेच मागचा शहाणा-
दुसऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन मनुष्य स्वतः शहाणा होतो व सावधगिरीने वागतो.
* पोटात एक ओठात एक-
लबाड माणसांचे विचार अनेक असतात त्यांच्या मनात एक असते व बोलतात दुसरेच.
* फुल ना फुलाची पाकळी-
जितके आपल्याला द्यायला पाहिजे तितके देणे जमत नसल्यास शक्य आहे तेवढेच देणे.
* बळी तो कानपिळी -
ज्या मनुष्याच्या अंगी पैशाचे ,अधिकाराचे, वशिल्याचे व शक्तीचे बळ असते. तो इतरांना छळतो किंवा त्यांच्यावर सत्ता चालवितो.
* बसता लाथ उठता बुक्की-
नेहमी शिक्षा करीत असणे.
* बडा घर पोकळ वासा-
दिसण्याची पण प्रत्यक्षात काही नसणे.
* बाप तसा बेटा-
जे वडिलांच्या अंगी चांगले किंवा वाईट गुण असतील ते मुलाच्या अंगी उतरणे.
* बुडत्याचा पाय खोलात-
ज्याचा अपकर्ष व्हायचा असतो त्याला सतत एका मागून एक असे येणाऱ्या संकटांना तोंड द्यावे लागते.
* बुडत्याला काठीचा आधार-
मोठ्या संकटात सापडलेल्या माणसाला वेळप्रसंगी कोणी थोडीशी मदत केली तरी त्याला महत्त्व असते.
* बैल गेला आणि झोपा केला-
एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.
* बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले-
आपल्या बोलण्याप्रमाणे जो वागतो त्या माणसाला मान दिला पाहिजे.
* बोलाचीच कढी व बोलाचाच भात-
नुसतीच बडबड कृती मात्र काहीच नसते.
* भरवशाच्या म्हशीला टोणगा-
ज्याच्यावर आपण अवलंबून असतो त्याने आयत्यावेळी दगा देणे.
* मरावे परी कीर्ती रुपी उरावे-
मनुष्य देहाने मरतो ,पण त्याने केलेल्या चांगल्या कामाच्या रूपाने जिवंत राहतो.
* मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी-
एखादी दिसण्यात सोपी व करण्यास कठीण अशी गोष्ट कोणी सहसा करायला पुढे येत नाही.
* मानला तर देव नाहीतर धोंडा
एखाद्याचा मान ठेवला तर ठेवला नाही तर नाही.
* मुलाचे पाय पाळण्यात दिसतात-
लहानपणी मोठेपणीच्या कर्तुत्वासंबंधी किंवा गुणदोषासंबंधी अंदाज लागतो.
* मुठभर मिशा हातभर दाढी-
एखाद्याचा एकच अवयव प्रमाणाबाहेर असतो तेव्हा त्याच्या बेडोलपणाचा उपहास करतात.
* यथा राजा तथा प्रजा-
अधिकारा वरील लोक जसे वागतात तसेच सामान्य लोकही वागतात.
* रात्र थोडी सोंगे फार-
वेळापूर आपण काम मात्र भरपूर.
* राजाला दिवाळी काय माहित-
जो मनुष्य नेहमी सुखात असतो त्याला कोणताच एक दिवस आनंदाचा असा नसतोच.
* रोज मरे त्याला कोण रडे
रोजच संकट येऊ लागली की त्याचे काहीच वाटेनासे होते.
* लाथ मारीन तेथे पाणी काढीन
सामर्थ्यवान व हुशार मनुष्य
* लेकीस बोले सुनेस लागे -
एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
* लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण
इतरांना उपदेश करायचा, आपण मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही.
* वराती मागून घोडे
योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. येऊ
* वडाची साल पिंपळाला लावणे
खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करून सांगणे.
* वासरात लंगडी गाय शहाणी
अडाणी माणसात थोडासा शिकलेला माणूस ही पंडित म्हणून घेतो.
* वळणाचे पाणी वळणानेच जाणार-
निसर्ग नियमाप्रमाणे सर्व गोष्टी होतात.
* वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावे-
सर्व गोष्टींची संधी आली असता ,होईल तो फायदा करून घ्यावा.
* विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर-
निश्चित निवारा नसणे ,थोडासा संसार नेहमी आपल्याबरोबर बाळगणे.
* शहाण्याला शब्दांचा मार-
शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबद्दल शब्दांनी समज दिली तरी पुरेशी असते.
* शितावरून भाताची परीक्षा
थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची कल्पना करता येते.
* शेरास सव्वाशेर
प्रतिपक्षापेक्षा वरच्या प्रतीचा एक वस्ताद तर दुसरा त्याहून सरस.
* सत्तेपुढे शहाणपणा नाही-
ज्याच्या हाती अधिकाराचे बळ असते त्याच्यापुढे शहाण्या माणसाचे काही चालत नाही.
* सरड्याची धाव कुंपणापर्यंत -
अल्प बुद्धीच्या माणसाच्या कार्याची झेप अल्पच असते.
* स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही-
स्वतः अनुभवल्याशिवाय एखाद्या गोष्टीची पूर्ण कल्पना येत नाही.
* साखरेचे खाणार त्याला देव देणार-
भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीची अनुकूलता असते.
* सुताने स्वर्ग गाठणे -
क्षुल्लक गोष्टीवरून नको त्या गोष्टीचा उठा ठेव करणे.
* हजीर तो वजीर -
जो ऐनवेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो.
* हत्ती गेला पण शेपूट राहिले-
कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि थोडासा भाग व्हायचा राहिला.
* हसतील त्याचे दात दिसतील-
लोकांच्या हसण्याची परवा न करणे.
* हातच्या काकणाला आरसा कशाला-
जी गोष्ट स्पष्ट किंवा उघड आहे ती दाखविण्यासाठी पुराव्याची जरुरी लागत नाही.
मराठी म्हणी व अर्थ: Marathi mhani v arth.
श्री राम गोवर्धन डोळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा